21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टींचे आंदोलन मागे

राजू शेट्टींचे आंदोलन मागे

सांगली : ऊसदराची मागणी मान्य झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरू असलेले ठिय्या आंदोलन ३६ तासांनंतर मागे घेण्यात येत असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मध्यरात्री केली. सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यावर शेट्टींचे काटा बंद आंदोलन सुरू होते. एफआरपी अधिक १०० रुपये प्रति टन मिळावेत अशी मागणी होती, ती दत्त इंडिया कारखाना प्रशासनाकडून मान्य करण्यात आली. सांगलीमधील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरू झाल्यावर बैठकाही झाल्या होत्या, मात्र त्या निष्फळ ठरल्या होत्या, त्यामुळे स्वाभिमानीकडून गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यासमोर रविवारपासून काटा बंद आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जाहीर करण्यात आली होती.

तर आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप देखील बंद झाले होते. अखेर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला आणि साखर कारखानदारांना आंदोलन तीव्र करण्याचा गर्भित इशारा देत, वसंतदादा साखर कारखान्यासमोरील आंदोलन सुरूच ठेवले होते. यामुळे अखेर दत्त इंडियाकडून दर देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यानंतर जिल्हाधिका-यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्त इंडियाकडून मिळालेल्या पत्राच्या अनुसरून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे मान्य करत असल्याचे लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले. यामुळे शेट्टींनी वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करत इतर उर्वरित १५ कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. तर आता यापुढील आंदोलन हे शिराळा तालुक्यातल्या दालमिया साखर कारखान्यावर असणार असल्याचेही जाहीर करत सांगली जिल्ह्यातल्या शेतक-यांना दर देण्यामध्ये आडकाठी असणा-या झारीतल्या शुक्राचार्यांच्या कारखान्याबाबतीतही लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR