अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलेच भोवले आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली.
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडले. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
तीन वर्षे कुस्ती खेळता येणार नाही
राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम म्हणाले की, पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होते. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचे कृत्य केले. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारं नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. मॅट विभागामधून महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे या चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले.
महेंद्र गायकवाडची नाराजी
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण दिल्यानंतर त्याविरोधात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप पंचांनी केला. तसेच महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या कृत्याचा सर्व पंचांनी निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत या दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.