रोहतक : हरियाणाच्या रोहतक येथे सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहीम याला हरियाणा सरकारने पुन्हा एकदा ५० दिवसांची पॅरोल दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी किंवा शनिवारी सकाळी तो जेलबाहेर येईल.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम सिंगला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राम रहीम याला बलात्कार व हत्येप्रकरणी २० वर्षांची शिक्षा झाली आहे. या अगोदर राम रहीमला मागच्या वर्षी जानेवारीत ४० दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर २०२२ मध्ये ४० दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
आपल्या दोन महिला शिष्यांवर बलात्काराच्या आरोपांखील त्याला २० वर्षांची शिक्षा तसेच हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टाने ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविले होते. माजी डेरा व्यवस्थापक रंजीत सिंह याच्या हत्या प्रकरणात कोर्टाने राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता पुन्हा एकदा राम रहीम जेलबाहेर येणार आहे.