31.2 C
Latur
Friday, March 21, 2025
Homeमहाराष्ट्रराम सुतार यांनी शिल्पकलेत महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले

राम सुतार यांनी शिल्पकलेत महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल अभिनंदन

मुंबई : भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सन्मान्य पुरस्कार आम्ही जाहीर केल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचे अभिनंदन केले.

जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा निर्माण करून देशाच्या अस्मिताचिन्हाचा यथोचित गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत. आपली सारी कला आणि सर्जनशीलता भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समर्पित करणा-या कलामहर्षी सुतार यांचे या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या कलासाधनेला शतश: प्रणाम कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेने महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, वयाची शंभरी गाठली असूनही मातीतून अक्षरश: जिवंत वाटावीत अशी शिल्पं निर्माण करणारे ज्येष्ठ राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण २०२४ देण्याचा निर्णय आम्ही घेतला.

समर्पण, कामाविषयी निष्ठा, मेहनत आणि आभाळाइतकी उंची गाठण्याची जिद्द हाच राम सुतार यांच्या यशाचा मंत्र आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांचे काम प्रेरणा देत राहील असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा देताना सांगितले. गेल्या वर्षीच आम्ही मालवण येथे छत्रपती शिवरायांचा भव्य आणि सुंदर असा पुतळा साकारण्याची जबाबदारी राम सुतारांवर सोपविली. मी स्वत: देखील राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव आणि सुतार यांच्याशी त्यावेळी बोललो. मला खात्री आहे की हा पुतळा करोडो शिवप्रेमींना प्रेरणा देणारा ठरेल.

दिल्लीत संसद भवन, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या ठिकाणी राम सुतार यांनी उभारलेले महनीय व्यक्तींचे आणि महापुरुषांचे पुतळे हे केवळ लोकप्रिय झालेले नाहीत तर तर ही शिल्पकला बघून जगातील नामवंत शिल्पकारांनी समाधान व्यक्त केले आहे. राम सुतार यांचा सन्मान करून आम्ही देशातल्या सगळ्या चांगल्या शिल्पकारांचा एकप्रकारे गौरव केला आहे असेही उपमुख्यमंत्री आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR