मुंबई : नाशिक येथील शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिक व पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याचे राजकारण आणि केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावरून टीका केली. तर, राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना रामायणातील वालीशी केली. उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, तुम्ही वचने मोडणारे आहात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. तत्पूर्वी भाषण करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रभू श्रीरामांचा दाखला देत भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली.
शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आगामी निवडणुकांचे रणशिंगच फुंकले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमॉक्रसी येथे आज सुरुवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.
सुषमा अंधारे यांनी प्रभू श्रीरामाचा दाखला देत, राम हे एकवचनी होते. पण, यांचा नेता ७२ तासांच्या आत विसरून जातो की, ७० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत सोबत घेतो, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदर्भ देत आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, ते आमचे देवाभाऊ इकडे एकवचनी म्हणतात, राष्ट्रवादीशी कधीही युती नाही असे म्हणतात, आणि पहाटं-दुपारी दोनदोनदा लव्ह मॅरेज करतात, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.