27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीसंपत्तीची शुद्धी असणा-या घराण्यात राम जन्मतो

संपत्तीची शुद्धी असणा-या घराण्यात राम जन्मतो

सेलू : श्री प्रभू रामचंद्र यांना जन्म घेण्यासाठी पृथ्वीतलावर तसे घराणे देखील असणे गरजेचे होते. कारण महापुरुषांची कुळे देहाने चालत नसतात. तर ती त्यांच्या ध्येयाने चालत असतात. त्यामुळे ज्या घराण्यात नितीमूल्यांची जपवणूक होऊन संपत्तीची शुद्धी असते, त्याच घराण्यात राम जन्माला येऊ शकतात, असे प्रतिपादन आशीर्वचनपर बोलतांना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे.

येथील हनुमानगढ परिसरात सुरू असलेल्या श्रीराम कथेचे निरूपण करतांना बुधवार, दि.१७ ऑक्टोबर रोजी ते बोलत होते. पृथ्वीवरील राक्षसांच्या त्रासाला कंटाळून पृथ्वीसह सर्व देवतांनी ब्रह्मदेवाकडे पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीवरील त्रास संपवण्याची मागणी केली. त्यावेळी ब्रह्मदेवतांनी सर्व देवतांना अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवले. मात्र, अवतार घेत असतांना भगवान प्रभु रामचंद्रांनी कुठल्या घराण्यात जन्म घ्यायचा ? यासाठी त्यांनी सर्व नीती मूल्यं जोपासले जाणारे घराणे रघुवंश कुळात जन्म घेतला.

रघुवंश कुळातील महाराज राजे दिलीप, राजे रघुवंश, महाराज दशरथ यांची यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी विशेष महती सांगून या घराण्याचा नावलौकिक भाविकासमोर मांडला. महाराज दशरथ यांच्या तीन पत्नींना एकूण चार अपत्यं झाले. त्या चारही अपत्यांचे नाव व त्यांची व्यक्तिमत्व यातील साम्य विस्तृतपणे मांडताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की; राम नाम हे ब्रह्म तत्व आहे.

राम नामात जो गोडवा आहे, तो अलौकिक आहे. ओम आणि राम एकच आहेत. मात्र, राम नामात आनंद आहे. ओम हे वितळलेल्या तुपाप्रमाणे परब्रम्ह आहे. तर राम हे थिजलेल्या तुपाप्रमाणे परब्रम्ह आहे. तूप हे एकच आहे. मात्र, त्यातील राम नामाचा गोडवा हा वेगळा आहे. सगळे योगी ज्यांचे चिंतन करतात तो राम असेही ते म्हणाले.

भरत तत्वातच रामतत्व
रामाचे बंधू भरत हे नाव खूप सरळ आहे. जो आख्ख्या विश्वाचे भरण पोषण करतो तो भरत. भक्तीच्या विश्वामध्ये आपलं खरंखुरूं पोषण व्हायचे असेल, तर भरतचे चरित्र पाहिले पाहिजे. अनेक वेळेला काटेकोर नियमांच्या पालनामुळे अंत:करणात ओलावाच राहत नाही; तसेच अतिप्रेमामुळे रोज नियम मोडले जातात. या दोन्ही गोष्टीशिवाय, देहाला नियम पाहिजे आणि मनाला प्रेम पाहिजे असे ज्याचे व्यक्तिमत्त्व आहे तो भरत. प्रेरणा आणि विवेक यांचा समन्वय पहावयाचा असेल तर तो भरतामध्ये दिसतो. आपल्याला भक्तीमध्ये अनुभूती येत नसेल तर भरताकडे बघा. एवढेच नव्हे तर अनुभूतीचा प्रांत उघडायचा असेल तर भरत ही गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. तुमच्या जीवनात भरत तत्व आले की राम तत्व आपोआप येईल. संपूर्ण जग रामाचे नाव घेते. मात्र, प्रभू श्रीराम चंद्र कायम भरताची आठवण करत असतात, असेही ते म्हणाले.

सेवेचा सर्वोच्च आदर्श लक्ष्मण
रामायणातील सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मण म्हणजे लक्ष्मी वाण. समृद्धी व सौंदर्य भरभरून ज्याच्याकडे आहे तो लक्ष्मण. एवढेच नव्हे, तर सेवा कशी करावी. याचा सर्वोच्च आदर्श म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मण हा आयोध्येतील ध्वज दंड आहे. भगवंतांनी अवघडातील अवघड काम लक्ष्मणाकडून करून घेतले. आपणास ध्वज दिसतो. मात्र, दंड दिसत नाही. नारायणाचा आधार भगवान शेष आहेत. मात्र, रामाचा आधार लक्ष्मण असल्याचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी यावेळी स्पष्ट केले.

शत्रुघ्नांचे कर्तृत्व महान
रामायणातील सर्वात महत्त्वाचे व अनोळखी पात्र म्हणजे शत्रुघ्न. शत्रुघ्नांचे काम खूप मोठे आहे. त्यांनी अयोध्या सांभाळली. अयोध्येतील अंतर्गत सुरक्षा ठेवली. वनवासाच्या काळातील १४ वर्षात आयोध्येतील संपत्ती १० पटीने वाढवली. आयोध्येवर कोणीही आक्रमण करण्याचे धाडस केले नाही. हे कोणामुळे घडले असेल, तर केवळ शत्रुघ्न मुळे घडले. आपणास पायातील दगड दिसत नाहीत. मात्र, पायातील दगडामुळे भिंती उभ्या असतात. शत्रुघ्न हा पायातील दगड असल्याचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यावेळी म्हणाले.

सिद्धींचे मूळ केवळ शांतचित्तामध्ये
प्रत्येक आईने आपल्या मुलींना संस्कार देणे आवश्यक आहे. रामायण आपल्या जीवनात उत्तरविणे गरजेचे आहे. मर्यादा शिकवणे गरजेचे आहे. मनोरंजनापेक्षा समाजाचे कल्याण कशात आहे? हे सांगणे गरजेचे आहे तरच समाजाकडून इतरांना सुधारण्यासाठी पोषक वातावरण होऊ शकेल. कनक, कांता, कीर्ती या तीन गोष्टी तपांचा नाश करतात. ज्याप्रमाणे कामाने तपाचा नाश होतो. अगदी त्याचप्रमाणे क्रोधाने देखील तपाचा नाश होतो. त्यामुळे सगळ्या सिद्धींचे मूळ केवळ शांतचित्तामध्ये असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे.

भावभक्तीच्या रसात कोजागिरी साजरी
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत कंठसाधना प्रस्तुत नादब्रह्म पांडुरंग ग्रुपच्या वतीने भावभक्तीमय रसात बुधवार, दि.१६ ऑक्टोबर रोजी श्री बालाजी मंदिर येथे कोजागिरी साजरी करण्यात आली. यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी उपस्थित सर्व कलावंतांचे स्वागत केले. गायिका वर्षा जोशी यांनी जय जय राम कृष्ण हरी, या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली; तसेच जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जगमे सुंदर है दो नाम, संत भार पंढरीत, सुखाच्या क्षणात, वृंदावनी वेणू, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम नाम गुणगाण करी, कानडा राजा पंढरीचा, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, ऐसी लागी लगन, आजी सोनियाचा दिनु, मेरी झोपडीकी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आदी सरस भावभक्ती गीते वर्षा जोशी व वैभव पांडे यांनी सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. यासाठी शांतीभूषण चारठाणकर, प्रकाशराव सुरवसे, पंकज शिरभाते, प्रशांत गाजरे, बालकलाकार श्रीकर, विश्वेश्वर जोशी, अनिल शिंदे आदींनी साथसंगत दिली. श्रीकांत उमरीकर यांनी निवेदन केले. सूत्रसंचालन रवि कुलकर्णी यांनी तर अविनाश बिहाणी यांनी आभार मानले. महाआरतीने सांगता झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR