दुबई/ न्यूयॉर्क : अयोध्येत काल (२२ जानेवारी) रामलला विराजमान झाले आहेत. यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू रामाचे पोस्टर झळकवण्यात आले.
याचबरोबर, सोमवारी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर श्रीरामाचे फोटो आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे थ्रीडी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तसेच रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’च्या सदस्यांनी लाडू वाटून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर, वॉशिंग्टन, डीसी, एलए, सॅन फ्रान्सिस्को, इलिनॉय, न्यू जर्सी, जॉर्जिया आणि बोस्टनसह संपूर्ण अमेरिकेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोल्डन गेट ब्रिजवर कार रॅली काढली. दुसरीकडे, अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मेक्सिकोमध्ये एका राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मेक्सिकोमध्ये बांधलेल्या या राम मंदिराचे उद्घाटन अमेरिकेतून आलेल्या एका पुजा-याने केले होते.
राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काल रात्री उशिरापासूनच राम मंदिराच्या मुख्य गेटबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. पहाटे २ वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करत आहेत. देशभरातून भाविक अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत. यासोबतच अयोध्येतील स्थानिक रहिवासीही राम मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी पोहोचत आहेत.