अयोध्या : रामलल्लाला मंदिरात विराजमान करण्यात आले. आज (गुरूवार) राम मंदिराच्या संदर्भातील विधींचा तिसरा दिवस आहे. राम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणा-या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याआधी आज (गुरुवारी) रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भ गृहामध्ये स्थापित करण्यात आली.
बुधवारी कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर आज गर्भगृहात एक अनोखा पूजन सोहळा झाला आणि (गुरुवारी), ‘जय श्री राम’च्या जयघोषात मूर्ती क्रेनचा वापर करून काळजीपूर्वक आत हलवण्यात आली.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महत्त्वपूर्ण सात दिवसांचे विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील. प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सोहळा दुपारी १२:२० वाजता सुरू होणार आहे.
दुपारी १ वाजता समारंभाची सांगता होईल. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मंदिराच्या बांधकामाच्या अपूर्ण अवस्थेचा हवाला देत सोहळ्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि भाजपचा राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे दावे फेटाळून लावत, श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर खरोखरच पूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी स्पष्ट केले की तळमजला, गर्भगृह आणि प्रभू रामाला समर्पित असलेले पाच मंडप पूर्णत: बांधलेले आहेत.