16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्ररश्मी शुक्ला पुन्हा पोलिस महासंचालक

रश्मी शुक्ला पुन्हा पोलिस महासंचालक

रश्मी शुक्ला पुन्हा पोलिस महासंचालक

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच रश्मी शुक्ला यांची सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केले होते. आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे.

राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आले होते. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीत तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता. विधानसभेचा निकाल जाहीर होताच रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिका-यांपैकी एक आहेत. त्यांनी भूगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २२ व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना २००५ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. २००८ मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सन २०१३ मध्ये रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यावेळी त्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक जणांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होणा-या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलिस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून २०२४ मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR