पूर्णा : केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि.१५ जानेवारी रोजी पूर्णा शहराजवळील पूर्णा- ताडकळस टी पॉइंट या राज्य महामार्गावर जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हिट अँड रन कायदा रद्द रद्द करण्याच्या घोषणा देत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला. यानंतर तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठवण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला.
या निवेदनात हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करण्यात यावा. ड्रायव्हर सुरक्षिततेसाठी कायदा अमलात आणावा. वाहन चालकांसाठीचे कल्याणकारी आर्थिक महामंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी जय संघर्ष चालक-मालक संघटनेचे संस्थापक संजय हळनोर, जिल्हाध्यक्ष सुरेश बायस, महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल पुंडगे, तालुकाध्यक्ष केरबा लोखंडे यांच्यासह शहरासह तालुक्यातील असंख्य चालक-मालक रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन दरम्यान पूर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षण प्रदीप काकडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.