35.5 C
Latur
Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट?

पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट?

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ६ मध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून दोन विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे दिसून आली आहेत. विद्यार्थ्यांच्या साहित्याची नासधूस झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या समस्येबाबत तीन महिन्यांपूर्वीच वसतिगृह प्रशासनाला कळवण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांनी मुख्य वसतिगृह प्रमुखांना अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) केला आहे. एका विद्यार्थ्याच्या पायाला सलग चार वेळा उंदराने चावा घेतल्याने त्याला दोन दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. तपासणीत रेबीजची लक्षणे आढळून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उंदरांनी खाण्याचे पदार्थ, कपडे आणि पुस्तके खराब केल्याची माहितीही समोर आली आहे.

त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलन
या वाढत्या समस्येवर त्वरित उपाय न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविपने दिला आहे. विद्यार्थ्यांना नवीन खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, संपूर्ण वसतिगृहात पेस्ट कंट्रोल करावे आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR