मुंबई : तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादाचा वाद सुरू असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकताच तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोपर्यंत आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसाद शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करणारा एक व्हीडीओ समोर आला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
सिद्धिविनायक मंदिराच्या लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराची पिल्ले असल्याचा एक व्हीडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हीडीओनुसार, सिद्धिविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्ले दिसत आहेत. प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप आता होत आहे. दरम्यान, यावर मंदिर प्रशासनाकडूनही उत्तर देण्यात आले आहे.
दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत. समोर आलेला व्हीडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचे तरी षडयंत्र असल्याचे सरवणकर म्हणाले. कोणीतरी प्लास्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हीडीओ काढला असावा, असे सरवणकर म्हणाले. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असल्याचेही ते म्हणाले.
प्रकरणाची चौकशी होणार : मुनगंटीवार
तर दुसरीकडे सिद्धिविनायक प्रसादाच्या टोपलीत उंदीर आढळल्याच्या प्रकरणाची चौकशी होणार, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मंदिर प्रशासन देखील घडलेल्या प्रकराची तपासणी करेल आणि योग्य ते स्पष्टीकरण देईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. व्हायरल फोटो आणि व्हीडीओची देखील तपासणी होणार आहे.
प्रसादाच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे ५० हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी ५० ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार, हे लाडू सात ते आठ दिवस साठवता येतात. मात्र, लाडूंमध्ये उंदरांची पिल्लं आढळून आल्याने मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.