मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी स्वबळाचा नारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर आता आघाडी मोडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राऊत यांच्यावर आगपाखड करताना, महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे अशीच आमची इच्छा आणि भूमिका आहे.
यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करतोय. याबाबत आता पक्षश्रेष्ठींशी आम्ही बोलू आणि तेच यावर निर्णय घेतील असेही गायकवाड यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गायकवाड यांनी राऊत यांनी, अशा गोष्टी थेट माध्यमांमध्ये जाऊन बोलण्यापेक्षा चर्चेच्या माध्यामातून सांगायला पाहिजे होती. ते त्यांच्या पक्षाचं व्यक्तिगत मत मांडत असतील. पण आमच्या पक्षाची भूमीका लवकरच सांगू असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.
राज्यात लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश आले नाही. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे विरोधीपक्षनेता मिळावा, अशी देखील संख्या नाही. यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून महायुती तयारीला लागली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. राऊत यांनी स्वबळाचा नारा देताना, लोकसभा, विधानसभेवेळी आम्हाला आमच्या पदाधिका-यांना संधी देता आली नाही. यामुळे पक्षावर त्याच्या परिणाम झाल्याचे कारण देत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना वेगळ्या लढणार असल्याचे म्हटले होते. यानंतर काँग्रेसह शरद पवार गटाकडून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
शरद पवार गटाकडून तर थेट आम्ही काँग्रेससोबत जाऊ अशी कबुली देण्यात आली आहे. तर काँग्रेसने आम्हीही एकटे लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. वर्षा गायकवाड यांनी, राऊत यांच्या वक्तव्याचा धागा धरत, आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे होती, पण आम्ही आघाडीचा विचार केला. जर तसा विचार केला असता तर मुंबईत आमच्या जागा निवडून आल्या असत्या. लोकसभेला मी काही तिकीट मागितलं नव्हतं तर ते पक्षाने दिलं होतं.