21 C
Latur
Wednesday, February 4, 2026
Homeराष्ट्रीयसंसदेत पुस्तकांवरून पुन्हा जुंपली

संसदेत पुस्तकांवरून पुन्हा जुंपली

निशिकांत दुबेंनी केला नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख स्पीकर चेंबरमध्येही राडा

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पुस्तकांवरून राजकीय महायुद्ध पेटले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्या संबंधांवरील पुस्तकाचा उल्लेख करत गांधी परिवारावर सडकून टीका केली, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.

निशिकांत दुबे यांनी भाषणादरम्यान अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. आजकाल अशा पुस्तकाचा गाजावाजा केला जात आहे जे अद्याप प्रकाशितही झालेले नाही. पण मी आज त्या पुस्तकांबद्दल सांगणार आहे, जी नेहरू घराण्याची गद्दारी, भ्रष्टाचार आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींनी भरलेली आहेत असे दुबे म्हणाले. त्यांनी एडविना अँड नेहरू या पुस्तकासह इतर काही पुस्तकांतील आक्षेपार्ह संदर्भ देण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन चीनच्या घुसखोरीबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींना हे पुस्तक कोट करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याला उत्तर देण्यासाठी बुधवारी भाजप खासदार निशिकांत दुबे मैदानात उतरले. दुबे यांनी केवळ प्रत्युत्तर दिले नाही, तर चक्क नेहरू-गांधी घराण्यावर लिहिलेली ३-४ वादग्रस्त पुस्तकेच सभागृहात आणली.

विरोधकांचा संताप
दुबेंच्या या विधानांमुळे काँग्रेस खासदारांच्या संतापाचा कडेलोट झाला. विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. स्पीकर ओम बिर्ला यांनी दुबेंना वारंवार टोकले, मात्र तरीही त्यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले. गोंधळ इतका वाढला की अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.

स्पीकरच्या चेंबरमध्येही खडाजंगी
सभागृह तहकूब झाल्यानंतर हे नाट्य संपले नाही. स्पीकर ओम बिर्ला यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना चर्चेसाठी आपल्या चेंबरमध्ये बोलावले होते. तिथेही विरोधकांनी आपला रोख कायम ठेवला. जर राहुल गांधींना एका पुस्तकावर बोलू दिले जात नाही, तर भाजप खासदाराला अशा वादग्रस्त पुस्तकांचा उल्लेख करण्याची परवानगी कशी दिली गेली? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. काँग्रेस खासदारांनी निशिकांत दुबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत अध्यक्षांकडे आपली नाराजी व्यक्त केली.

संसदेत तणावाचे वातावरण
या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरात अनेकदा विस्कळीत झाले. सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर दुपारी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारत-अमेरिका व्यापारावर निवेदन दिले, मात्र गोंधळामुळे काहीही ऐकू येत नव्हते. दरम्यान, मंगळवारीच गैरवर्तणुकीमुळे काँग्रेसच्या ७ आणि माकपच्या १ खासदाराला निलंबित करण्यात आले होते, त्यामुळे विरोधक आधीच आक्रमक भूमिकेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR