नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आजच्या केंद्रीय बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आणलेला जाहीरनाम्यातीलच घोषणा केल्याचा दावा केला आहे. आमचाच जाहीनामा अर्थमंत्री सीतारामन यांनी वाचून दाखवल्याबद्दल आम्हाला आनंद आहे अशी खोचक प्रतिक्रिया चिदंबरम यांनी बजेटवर दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेटमध्ये पंतप्रधान इंटर्नशीप योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत तरुणांना इंटर्नशीपच्या एक वर्षाच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला ५,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. पण याच योजनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, केंद्र सरकारने ज्या इंटर्नशीप योजनेची घोषणा केली आहे. ही घोषणा काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आणलेल्या जाहीरनाम्यातच केली होती. आमच्या घोषणेनुसार, डिप्लोमा किंवा डिग्री घेतलेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासह एक वर्षासाठी ८,५०० रुपये देण्यात येणार होते. या योजनेला काँग्रेसने पहिली नोकरी पक्की असे नावही दिले होते.
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आजच्या बजेटवरुन तोंडसुख घेतले. त्यांनी म्हटले की, मला या गोष्टीचा आनंद होतोय की अर्थमंर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा लोकसभेचा जाहीरनामा वाचला आहे. मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की, त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या ३० व्या पानावर उल्लेख केलेल्या रोजगाराशीसंबंधीत मुद्दा स्विकारला आहे.
चिदंबरम यांनी पुढे म्हटले की, मला या देखील गोष्टीचा आनंद आहे की, सीतारामन यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्र. ११ वर उल्लेख असलेल्या प्रत्येक ग्रॅज्युएट तरुणासाठी देण्यात येणा-या भत्त्याची योजना सुरु केली. अर्थमंर्त्यांनी काँग्रेसच्या घोषणापत्रातील इतरही काही मुद्यांची कॉपी करायला हवी होती. मी लवकरच सुटलेले बिंदू जोडणारी एक यादी तयार करणार आहे.