नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये बसलेल्या प्रेमी युगुलाला लुटणारे आरोपी तोतया पोलिस नव्हे तर खरे पोलिस निघाले. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून त्यांच्याविरोधात वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशपेठमधील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला कारमधील लाईट बंद करून बसले होते. त्यावेळी कळमना पोलिस ठाण्यातील पंकज यादव व संदीप यादव हे दोन कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या कुटुंबियांनाही पोलिस ठाण्यात बोलवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे विवाहित असलेली महिला घाबरली. पंकज आणि संदीपने त्यांना पैसे मागितले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची मागणी केली. तसेच तरुणाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चेनदेखील नेली.
तरुणाने वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अगोदर पोलिसांना आरोपी तोतया पोलिस असल्याची शंका आली. मात्र सीसीटीव्ही व तांत्रिक पद्धतीने तपास केला असता त्यात पंकज व संदीप हे दोघे असल्याची बाब समोर आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी याअगोदरदेखील असे प्रकार केल्याचा संशय आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले आहेत. हे दोघेही अगोदर चार्ली होते व त्यांच्याविरोधात गैरप्रकारांच्या तक्रारी आल्याने त्यांना हटविण्यात आले होते. आता पोलिस आयुक्तांकडून या दोघांवरही काय कारवाई करण्यात येते याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.