22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपमध्ये बंडखोरी, भंडा-यात चुरस

भाजपमध्ये बंडखोरी, भंडा-यात चुरस

  • पडघम
    भंडारा-गोंदिया मतदारसंघ

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये असंतोष धुमसत होता. त्याचा परिणाम म्हणून नाराज संजय कुंभलकर यांनी बंडखोरी केली. त्यांनी बसपातून उमेदवारी मिळवत मेंढेंसमोर आव्हान उभे केले आहे. कुंभलकर तेली समाजाचे आहेत. या मतदारसंघात तेली समाजाची मते निर्णायक आहेत. त्यातच काँग्रेसने वैद्यकीय क्षेत्रातील स्वच्छ प्रतिमेचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चुरस वाढली असून, बंडखोरीचा भाजपवर किती परिणाम होतो, यावर मेंढेंचे भवितव्य अवलंबून आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला २५ वर्षांनंतर विजयाची संधी मिळणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच मतदारसंघातील आहेत. याच मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते. त्यामुळे पटोले यांचे पाठबळ आणि स्वच्छ आणि उच्च शिक्षित अशा डॉ. पडोळे यांच्या उमेदवारीचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो, असे बोलले जात आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याने त्यांचे बळ वाढले आहे. परंतु मतदार आणि शेतक-यांत असलेला असंतोष, महागाईच्या वाढत्या झळा यामुळे सर्वसामान्यांतूनही नाराजी आहे. या नाराजीचे मतात रुपांतर झाल्यास याचा महायुतीला फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे. त्यातच मेंढे यांच्यासमोर बंडखोरीचे आव्हान आहे. यातून ते मार्ग कसा काढतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथून उभे राहावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, पटोलेंनी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणुकीत मेंढे, कुंभलकर व पडोळे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकीत भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यावेळी २५ वर्षांनंतर काँग्रेसचा पंजा हे चिन्ह मतदारांना दिसणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे नवखे आहेत. पण पेशाने डॉक्टर असल्याने सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे ते सर्वपरिचित उमेदवार आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील कै. यादवराव पडोळे जिल्हा दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे सहकार चळवळ व राजकारणात त्यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली.

कुंभलकर यांची बंडखोरी
भाजपमधील माजी नगरसेवक संजय कुंभलकर यांनी भाजपचा राजीनामा देऊन बसपची उमेदवारी मिळवली. कुंभलकर यांच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होऊ शकते, याचा फटका मेंढे यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपचे डॉ. फुकेही नाराज
भाजपचे सुनील मेंढे मोठे कंत्राटदार आहेत. ते यापूर्वी भंडारा शहराचे नगराध्यक्ष होते. मात्र, त्यांच्यावर भाजपचा एक गट नाराज आहे. यासोबतच माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनाही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.

  • समाजाची भूमिका महत्त्वाची
    या मतदारसंघात पोवार समाजाची मते महत्त्वाची आहेत. हा समाज भाजपचा पारंपरिक मतदार आहे. यापूर्वी चुन्नीलाल ठाकूर व शिशुपाल पटले यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या समाजाची मते ज्यांना मिळतील, तोच विजयाचा मानकरी ठरेल, असे या मतदारसंघाचे समीकरण आहे.
  • कुणबी, तेली समाजाची
    मते निर्णायक ठरणार
    भंडारा-गोंदिया मतदारसंघात कुणबी, तेली, पोवार समाजाची सर्वाधिक मते आहेत. मागील काही निवडणुकांत कुणबी समाजाचा उमेदवार हमखास निवडून येत आहे. त्यामुळेच भाजप व काँग्रेसचे उमेदवार कुणबी समाजाचे आहेत. या मतदारसंघात तेली समाजाची मतेही कुणबी समाजाच्या खालोखाल आहेत. कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पोवार समाज कुण्या बाजूने झुकतो, त्यावर बरेच गणित अवलंबून आहे.
  • …६ विधानसभा मतदारसंघ
    भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली या तीन तालुक्यांचा तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया या तालुक्यांचा समावेश आहे.
  • २०१९ मधील मतदान
    सुनील मेंढे (भाजप) ६,५०,२४३ ५२.२३
    नाना पंचबुद्धे (काँग्रेस) ४,५२,८४९ ३६.३८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR