28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरआडत बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

आडत बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक सुरु झाली आहे. दीपावलीचा सण पुढील आठवड्यात असल्यामुळे आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आर्थिक गजर असल्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या राशी करुन विक्रीसाठी थेट आडत बाजारात आणत आहेत. दि. ४ नोव्हेंबर रोजी आडत आजारात ५२ हजार ३४७ क्विंटल एवढी विक्रमी आवक सोयाबनची झाली आहे.

जिल्ह्यात ऊसानंतर नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे जवळपास साडेचार लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदाचा पावसाळा तसा लहरीच होता. विलंबाने पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्याही उशीराच झाल्या होत्या. पेरणीनंतर पिकांपूरता पाऊस झाल्याने पीकही चांगले उगवले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आशा वाढल्या होत्या. परंतू, ऑगस्ट महिन्यात पावसाने ताण दिल्याने व रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांनी घट आली. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतक-यांनी सोयाबीनची काढणी केली असून राशी शेवटच्या टप्प्यात आहेत तर रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे.

शेतक-यांना रब्बीसाठी खत, बी, बियाणांसाठी आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यात दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. शेतकरी सोयाबीनच्या राशी करुन शेतमाल थेट विक्रीसाठी आडत बाजारात आणत आहेत. आडत बाजारात शेतमालाची मोठी आवक होत आहे. शनिवारी सोयाबीनची आवक ५२ हजार ३४७ क्विंटल आवक होती. गहू २५ क्विंटल, ज्वारी रब्बी ६७ क्विंटल, हरभरा ४६४ क्विंटल, तूर ५४ क्विंटल, मुग ६९ क्विंटल, उडीद ३२० क्विंटल तर करडईची ५८ क्विंटल आवक झाली. आर्थिक अडचणीतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असल्याने बाजार समितीच्या आडत बाजारात वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्याचबरोबर आडत बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत असल्याने रात्री उशिरापर्यंत मापतोल होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR