29.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरात क्षयरोगात विक्रमी घट

छत्रपती संभाजीनगरात क्षयरोगात विक्रमी घट

छत्रपती संभाजीनगर : मागच्या केवळ आठ वर्षांत क्षयरोगाचे जिल्ह्यातील प्रमाण ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे आणि त्यामुळेच सुवर्णपदकाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांत चाचण्यांचे प्रमाण दीडपटीपर्यंत वाढत गेलेले असताना क्षयरुग्णांचे प्रमाण विशिष्ट टप्प्यानंतर घटत गेल्याचे आकडेवारीनुसार अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या सुवर्णपदकाच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड झाली आहे.

सन २०१५ मध्ये जिल्ह्यात २४ हजार ८८१ रुग्णांच्या क्षयरोगासाठी चाचण्या झाल्या आणि त्यातील एक हजार ३२ रुग्णांना क्षयरोग असल्याचे वैद्यकीय चाचण्यांमध्ये निदान झाले. त्यानंतर २०१६ मध्ये २६ हजार ५३ चाचण्यांमध्ये ९७९ क्षयरुग्ण आढळले. त्याचप्रमाणे २०२३ मध्ये म्हणजेच जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या काळात ३९ हजार ५१७ चाचण्यांमध्ये ५९७ क्षयरुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ २०१५ या वर्षांत २४ चाचण्यांमध्ये एक क्षयरुग्ण आढळत होता; तर २०२३ या वर्षांत ६६ चाचण्यांमध्ये एक क्षयरुग्ण आढळत आहे. साहजिकच क्षयरोगाचे प्रमाण आढळून येण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे आणि या व इतर निकषांच्या आधारे राष्ट्रीय सुवर्णपदकाच्या स्पर्धेसाठी राज्यातून केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड झाली आहे, याकडे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर यांनी लक्ष वेधले.

सर्वाधिक मृत्यूच्या यादीतले सहावे कारण
अजूनही म्हणजेच २०२३ मध्येही सर्वांत जास्त मृत्यू पावणा-या भारतीय व्यक्तींच्या आजारांमध्ये क्षयरोग हा सहाव्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ पर्यंत क्षयमुक्तीची मोहीम यापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचाच भाग म्हणून २०१५ मध्ये एक लाख लोकसंख्येमागे आढळून आलेल्या २१६ क्षयरुग्णांचे प्रमाण ४४ क्षयरुग्णांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात हातभार लागावा या हेतुने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची स्पर्धा घेतली जात आहे आणि याचा निकाल क्षयरोगदिनी म्हणजेच २४ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR