नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात भारताच्या कच्चे तेलाच्या आयातीच्या खर्चात लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे देशाच्या बा खात्याला मोठा आधार मिळाला आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ऍनॅलिसिस सेलच्या आकडेवारीनुसार, भारताचा तेल आयात खर्च वार्षिक ८.५ टक्क्यांनी घसरून ९.७ अब्ज डॉलरवर आला आहे.
गेल्या वर्षी याच काळात हा खर्च १०.६ अब्ज डॉलर इतका होता. भारताने आयात केलेल्या तेलाच्या प्रमाणात वाढ झाली असूनही एकूण खर्चात घट झाली आहे. डिसेंबरमध्ये भारताने २०.८ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, ती गेल्या वर्षी २०.२ दशलक्ष टन होती. देशांतर्गत इंधनाची वाढती मागणी आणि आर्थिक हालचालींमुळे आयातीचे प्रमाण वाढले असले, तरी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती नरमल्याने भारताची मोठी बचत झाली आहे. भारत गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. आयात खर्चातील ही घट व्यापारी तूट कमी करण्यास मदत करते. रुपयावरील दबाव कमी होतो आणि परकीय चलनसाठा सुरक्षित राहण्यास मदत होते. वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील खर्च कमी झाल्यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवणे सरकार आणि मध्यवर्ती बँकेला सोपे जाऊ शकते.

