नवी दिल्ली : शालीमार बाग येथील भाजप आमदार रेखा गुप्ता दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री बनल्या. रामलीला मैदानावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
रेखा गुप्ता यांच्यासोबत ६ मंत्र्यांनीसुध्दा यावेळी शपथ घेतली. यामध्ये प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांचा समावेश आहे. शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना सांगितले की ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या हायकमांडचे आभार मानते. मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीची मुख्यमंत्री होईन. मी शीश महालात राहणार नाही.
शीश महाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. अरविंद केजरीवाल यांनी ते बांधले होते. केजरीवाल यांनी नियमांचे उल्लंघन करून ते बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजपनेही तो निवडणुकीचा मुद्दा बनवला होता.