मुंबई : एसटी कर्मचा-यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचा-यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.
एसटी कर्मचा-यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचा-यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज सांगोला तालुक्याच्या दौ-यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचा-यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
या चर्चेअंती एसटी कर्मचा-यांचे या महिन्याचे उर्वरित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.
निधी मिळत नसल्याची तक्रार
सरकारकडून एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी दर महिन्याला निधी दिला जातो. प्रत्येक महिन्यात मागणीनुसार निधी मिळत नसल्याची तक्रार सातत्याने एसटी महामंडळाकडून केली जाते. निधी कमी मिळाल्याने तूट वाढून पीएफ, ग्रॅच्युईटी, बँख कर्ज, एलआयसी अशी जवळपास ३ हजार ५०० कोटींची देणी कर्मचा-यांच्या वेतनातून कपात होऊनही तो निधी संबंधित संस्थांना दिला गेलेला नाही.
अर्ध्याच वेतनाने कर्मचारी हैरान
एसटी महामंडळाने यंदा सरकारकडे मार्च महिन्याच्या वेतनासह इतर थकीत देणी देण्यासाठी ९२५ कोटींच्या निधीची मागणी केली होती. मात्र केवळ २७२ कोटी ८६ लाख रुपयेच राज्य सरकारने दिले. यामुळे एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचा-यांना मार्च महिन्याचे अर्धेच वेतन मिळणार आहे. आधीच उशिर झाला आहे आणि त्यात अर्धेच वेतन मिळणार असल्याने कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली होती.
एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण
एसटी महामंडळाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले होता की, एसटी महामंडळाला कर्मचा-यांचे वेतन आणि एलआयसीसह इतर निधी असे मिळून ४६६ कोटी रुपयांची गरज आहे. मात्र सरकारकडून ३०५.२९ कोटी रुपये इतकाच निधी मिळाला. त्यामुळे कर्मचा-यांना ५६ टक्के वेतन दिले आहे. सरकारकडून निधी मिळताच उर्वरित वेतन दिले जाईल असे आश्वासन एसटी महामंडळाकडून देण्यात आले होते.