35 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeमहाराष्ट्रकृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी शेतक-यांचा वारंवार अपमान होतोय

मुंबई : प्रतिनिधी
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतक-यांचा अपमान करत आहेत. शेतक-यांना भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. शेतक-यांचा अपमान करणा-या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सत्तेत आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते ते अद्याप पाळलेले नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते, त्यात कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांचा शेतक-यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतक-याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती व शेतक-याला अनुकुल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहिल. पण भाजप युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. मूठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ केले. तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही.

मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे वाचले पण मंत्री हे मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री नमुना आहे असे आम्ही म्हटले होते, माणिकराव कोकाटे हा त्यातीलच एक नमुना आहे अशा मंत्र्यांना आवर घालावी. शेतमालाला भाव नाही, हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे, शेतकरी संकटात असून दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याची कृषी मंत्री वा भाजपा युती सरकारला लाज वाटत नाही पण उलट शेतक-यांनाच अजब प्रश्न विचारता, हा सत्तेचा माज शेतकरी नक्की उतरवेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR