28.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeसोलापूरबदली यादीतील त्रुटी दूर करा, जिल्हा शिक्षक समितीची मागणी

बदली यादीतील त्रुटी दूर करा, जिल्हा शिक्षक समितीची मागणी

सोलापूर : शालेय शिक्षण व ग्रामविकास मंत्रालयाने काढलेला शासन निर्णय विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना तालुका स्तरावरुन सादर करण्यात आलेल्या यादीमध्ये दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाद्वारे केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना याबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षक समितीच्या मागणीनुसार मुख्याध्यापक बदली, पदोन्नती व त्यानंतर उपशिक्षक बदली अशा क्रमाने नियोजन केल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद दिले. मात्र, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेल्या यादीमध्ये अनेक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.

यामध्ये शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग १ व २ मधील अनेक मुख्याध्यापक व शिक्षकांनी मागील तीन वर्षांत लाभ घेतला नाही तरीही त्यांचा बदली अर्ज बाजूला करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. याशिवाय बदल्यांसाठी ३० जून ही अर्हता तारीख धरण्यात यावी, ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली. शिवाय बदल्यांसंदर्भात जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम असून तो दूर करण्यासाठी स्वयंस्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विशेष संवर्गातील शिक्षकांची स्वतंत्र माहिती संकलित करुन बदलीचा लाभ देण्यात येईल असे स्पष्ट केले.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक नेते अमोघसिध्द कोळी, मो. बा. शेख, कन्नड विभागप्रमुख बसवराज गुरव, कैलास काशीद यांनी भाग घेतला. यावेळी उम्मीद सय्यद,महिपती अनुसे, योगेश भांगे, सूर्यकांत कमळे, वासुदेव बाबर, राजीव पाटील, परमेश्वर गायकवाड, बाळासाहेब काटे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR