लातूर : प्रतिनिधी
परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे लावलेले बॅनर काढण्याची धडक कारवाई लातूर शहर महानगरपालिकेकडून मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. यापुढे कोणीही परवानगी न घेता बॅनर लावू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मनपाकडून देण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने अनधिकृत पोस्टर्स,बॅनर्स होर्डिंग व कमानीबाबत आदेश दिलेले आहेत. दि. ३१ जानेवारी २०१७ नुसार महाराष्ट्र मालमत्ता वीरुपन प्रतिबंध कायदा १९९५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत तरतुदीनुसार कार्यवाही करणेस्तव उपायुक्त्त (सामान्य) यांची नोडल ऑफिसर तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची क्षेत्रीय प्राधिकृत अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची प्रभाग प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त्ती करण्यात आलेली आहे.
मनपाने शहरातील व्यावसायिक व नागरिकांना आवाहन करुन पोस्टर्स व जाहिराती लावण्यासाठी परवानगी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती, असे असतानाही शहराच्या विविध भागात अनधिकृत पोस्टर्स लावलेले आढळून आले. त्यामुळे मनपाने थेट कारवाई करुन चारही झोनमधील १०३ अनधिकृत बॅनर्स मंगळवारी काढून टाकले. ‘ए’ झोनमध्ये क्षेत्रीय अधिकारी कलीम शेख यांनी २७ बॅनर्स काढले. ‘बी’ झोनमध्ये क्षेत्रीय अधिकारी विजय राजुरे यांनी कारवाई करत २०, ‘सी’ झोनमध्ये पवन सुरवसे यांनी २६ तर ‘डी’ झोनमध्ये क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी अनधिकृतपणे लावलेले ३० बॅनर्स काढून घेतले.