पुणे : पुण्यातील चाकणमध्ये अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दगडाने ठेचत हत्या करतानाचा त्यांनी व्हीडीओही बनवला आणि तो इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरही ठेवला. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी- चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना सोमवारच्या रात्री घडली.
शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
तर हत्या करणा-यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे. मृत मुलगा, मुख्य आरोपी अन् तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलात आणि तिस-या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत मुलाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृतकाला दगडाने ठेचले.