मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी प्रशासनाला १०० दिवसांचा आराखडा दिलेला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाने ठोस कामगिरी करावी हा यामागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात कामाच्या नुसत्या घोषणा नाही तर १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी आज एका मुलाखतीदरम्यान १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देण्यामागील काय कारणे आहेत, या विषयी भूमिका मांडली. तीन पक्ष एकत्रित असल्यानंतर प्रशासनामध्ये तुम्हाला किती मोठे आव्हान आहे असे वाटते? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही गेले अडीच वर्ष तीन पक्षाचे सरकार चालवले. आताही तीन पक्षाचे सरकार चालवत आहोत. अनेक महत्वाचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की प्रशासनामध्ये त्या काही अडचणी येतात.
प्रशासनासाठी आमची लाईन फार स्पष्ट आहे. कारण आमचे धोरणावर फार दुमत नाही. त्यामुळे धोरणाची एक दिशा सर्व विभागांना दिलेली आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक विभागाला दिला आहे. आमच्या सरकारमधील काही मंत्री देखील त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यात कुठेही अडचण नाही. त्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की १०० टक्के टार्गेट पूर्ण झाले पाहिजे. त्यामधील काय टार्गेट पूर्ण केले याचा एक रिपोर्ट आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.