नवी दिल्ली : भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस कोचीने अरबी समुद्रात अपहरण झालेल्या एमव्ही रुएन या माल्टा मालवाहू जहाजाची सुटका केली होती. आता एका जखमी क्रू मेंबरलाही वाचवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. क्रू मेंबरला गोळी लागली होती, तो जखमी होता. जहाजाचे अपहरण करताना चाच्यांनी गोळीबार केला होता, या गोळीबारात हा क्रू मेंबरही जखमी झाला होता.
भारतीय नौदलाला १४ डिसेंबर रोजी अलर्ट प्राप्त झाला होता. यानंतर नौदलाने आपली एक युद्धनौका एडनच्या खाडीत (अरबी समुद्रात) अपहरण करण्यात आलेल्या जहाजाच्या मदतीसाठी पाठवली. अधिका-यांनी मंगळवारी सांगितले की, अपहरण केलेल्या जहाजावरील १८ क्रू सदस्यांपैकी एकाच्या खांद्याजवळ गोळी लागली होती. त्याची सुटका केल्यानंतर त्याला उपचारासाठी आयएनएस कोचीमध्ये नेण्यात आले.
नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, जखमी क्रू सदस्यावर सुरुवातीला आयएनएस कोची येथे उपचार करण्यात आले. परंतु तात्काळ वैद्यकीय सेवेची गरज असल्याने त्याला नंतर ओमानमधील एका बंदरात नेण्यात आले. माल्टाचे जहाज सोमालियाच्या पाण्यात घुसले होते. अरबी समुद्रात सहा चाचे या जहाजावर चढले आणि या जहाजाचे अपहरण केले.