पुणे : महिला आरक्षणाचे विधेयक मान्य होणार नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी घेतली आणि महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मान्य झाले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरुवात झाली असे मत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
जागतिक मातृदिनानिमित्त बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या ‘मातृनाम प्रथम’ या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, वर्षा तापकीर, राणी भोसले, अश्विनी भागवत, हर्षवर्धन पाटील, अभिनेता संकर्षण क-हाडे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आणले.
महिला जर चूल आणि मूल आणि घर सांभाळू शकते, तर ती गाव, नगर परिषद, महापालिका देखील सांभाळू शकते, असा विश्वास त्यांना होता. महिला आरक्षणाचे विधेयक मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली होती. पहाटे ४ वाजेपर्यंत सभागृह चालवून महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून घेतले. महाराष्ट्र हा ख-या अर्थाने मातृ प्रथम राष्ट्र आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण महत्त्वाचे आहे. त्यांना मॉंसाहेब जिजाऊंनी घडवले, असेही ते म्हणाले.
पहलगामचा बदला महिलांनीच घेतला
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्यानंतर त्याचा बदला घेत भारताने प्रत्युत्तर द्यावे, अशी भावना जनसामान्यांमध्ये होती. केंद्राच्या पातळीवर पावले उचलण्यात आली. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. आपण सर्वजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो. त्याहीवेळी दोन महिलांनीच माध्यमांसमोर येऊन याची माहिती दिली, हे महिलांना दिलेल्या आरक्षणामुळेच शक्य झाल्याचे अजित पवार म्हणाले.
व्हीडीओ कॉलवरूनच अंत्यविधी होतायेत
सध्याचा काळ पाहता मुलांवर लहानपणापासून संस्कार झालेच पाहिजेत. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील आयुष्यभर झटतात. उच्च शिक्षण घेऊन अनेकांची मुले, मुली, सुना, जावई परदेशात जातात. तिथेच स्थायिक होतात. दुर्दैवाने ते आपल्या आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांचे निधन झाल्यावर चक्क व्हिडीओ कॉलवरुनच अंत्यविधीचा कार्यक्रम करतात. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मुले सांभाळत नसल्याने नाईलाजाने आता आम्हाला वृद्धाश्रम काढावे लागत असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.