22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल?

निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल?

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील. तसेच काही नवीन चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, असे नेते नाराज होऊ नयेत, म्हणून महामंडळांवर त्यांची वर्णी लावण्यात येणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा बदल केला जाणार असून काही पालकमंत्रीपदांचीही अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महामंडळावर अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आली नाही, त्यावरही नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती आहे.

स्थानिक राजकारण, जातीय समीकरण आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन चेह-यांना संधी दिली जाईल. सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन खाती आहेत, त्यामध्ये बदल होऊन विधानसभेच्या संख्याबळानुसार त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांवरही निर्णय?
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची निवडही प्रलंबित असून त्याचाही निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीत, त्यांना महामंडळ देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचीही माहिती आहे.

गोगावले, शिरसाटांची वर्णी?
राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी नऊ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. नंतरच्या काळात अजित पवारांची राष्ट्रवादीही सत्तेत आल्याने त्यांनाही नऊ मंत्रिपदे देण्यात आली. त्यामुळे शिंदे गटातील इच्छुक आमदारांची संधी हुकली. आता शिंदे गटाचे भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासह अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. आता त्यांना संधी मिळणार का, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR