मुंबई : प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव सोमवार दि. २४ मार्च रोजी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव आता केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे.
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून अस्पृश्यता निवारण तसेच स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडल आहे असे रावल म्हणाले.
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी देशात महात्मा गांधी व महात्मा फुले हे दोनच राष्ट्रपुरुष असे आहेत की ज्या महात्मा ही उपाधी जनतेने दिली आहे.
भारतरत्न अनेक आहेत, पण महात्मा ही उपाधी अधिक मोठी आहे. त्यांचे महत्व कमी होऊ नये, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा महात्मा फुले यांना लोकमान्यता आहेच, ते नेहमीच राहील. भारतरत्न दिल्याने त्याचे महत्व कमी होणार नाही असे सांगितले. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.