22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रविरोधकांना फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार; शंभुराज देसाई

विरोधकांना फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार; शंभुराज देसाई

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यातील महायुती सरकारमधील जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड, शिवसेनेकडून शंभुराज देसाई, आनंद परांजपे व शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभुराज देसाई यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपापल्या पक्षांतर्गत बैठका झाल्या, महायुती म्हणून आम्ही एकत्रदेखील बैठका घेतल्या. सर्वप्रथम २८८ मतदारसंघांत महायुतीचे समन्वयक नेमण्यात आले आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत.

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती एकसंध राहणार का ? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या प्रमुख पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत घेण्यात आली.

महायुतीत संपूर्णत: समन्वय आहे. तिन्ही पक्षांतील राज्यातील प्रमुखांना सर्व बाबतीत सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत,असे देसाई म्हणाले. तीन पक्षांचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणे, कुठेही रुसवेफुगवे राहणार नाहीत, कोणतीही नाराजी, गैरसमज राहू नयेत याची जबाबदारी प्रत्येक पक्षाने आपापल्या मंत्र्यांवर, आमदारांवर आणि विधानसभा समन्वयकांवर देण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

एखाद्या विधानसभा क्षेत्रात महायुतीमध्ये एका पक्षाकडे आहे, तिथे उमेदवारी मिळावी म्हणून महायुतीमधीलच दुस-या पक्षाचे नेते इच्छुक आहेत, माध्यमांमध्ये ब-याचदा अशा बातम्या येतात. पण उमेदवारी मागणे, इच्छा प्रदर्शित करणे हे लोकशाही जिवंत असल्याचे प्रतीक आहे.

म्हणून कोणी उमेदवारी मागितली, कोणी आग्रह केला म्हणून आमच्यात काही धुसफूस आहे, रस्सीखेच आहे, असे बिलकूल नाही. आमच्यात (महायुती) पूर्णपणे समन्वय आहे, असे देसाई यांनी जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना स्पष्ट केले. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत, असेही ते म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीबद्दल आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल प्रचंड गैरमज मतदारांच्या मनात निर्माण करून देण्यात आला. त्या गैरसमजाला, अपप्रचाराला, खोट्या प्रचाराला, त्या फेक नरेटिव्हला मतदार काही अंशी बळी पडले. आता फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार, असे आता संपूर्ण महायुतीने ठरविले आहे, असेही देसाई यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR