मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय महागाई भत्त्यातही लवकरच वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महागाई भत्त्यातही वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.
देशात केंद्र सरकारचे कर्मचारी आणि २५ इतर राज्यांत सरकारी कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचा-यांचे निवृत्तीचे वयही ६० वर्षे करावे, अशी मागणी मागच्या अनेक वर्षांपासून सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित कर्मचा-यांच्या संघटनेला याबाबत आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्य कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेऊ शकते, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी महासंघाच्या पदाधिका-यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासंदर्भात आश्वासन दिल्याचे समजते.