हैदराबाद : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंथ रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची आणि भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर ११ आमदारांनी देखील गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. हैदराबादच्या लाल बहादूर शास्त्री स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला, जिथे रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.
गुरुवारी दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी एलबी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पडला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित होते. रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे पहिले काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि २०१४ मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत.
रेवंथ रेड्डी यांच्या सोबत भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर नालामाडा उत्तम कुमार रेड्डी, सी दामोदर राजनरसिम्हा, कोमटिरेड्डी वेंकट रेड्डी, दुद्दिला श्रीधर बाबू, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, पूनम प्रभाकर कोंडा सुरेखा, डी. अनसूया सीताक्का, तुम्मला नागेश्वर राव, जुपल्ली कृष्ण राव आणि गद्दाम प्रसाद कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ११९ जागांपैकी काँग्रेसने ६४ जागा जिंकल्या आणि बीआरएसला ३९ जागांवर समाधान मानावे लागले.