हैदराबाद : प्रतिनिधी
तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ते दि. ७ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला. पण हाय कमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर यासंबंधीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडवर सोपविण्यात आला.
त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी रेवंत रेड्डी यांचे नाव घोषित करण्यात आले. तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार असलेले रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. रेवंत रेड्डी यांच्यावर अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच लोकसभा मतदारसंघात त्यांचे बरेच कामे प्रलंबित आहेत. असा ज्येष्ठ नेत्यांचा आरोप होता. मात्र, कॉंग्रेस हायकमांडने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले.
रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती चे पी नरेंद्र रेड्डी यांचा ३२ हजारांवर मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यामुळे त्यांना लॉटरी लागली.