मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह असल्याने विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासकामांचा आढावा घ्येण्याची मागणी केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या प्रादेशिक विकासाशी आणि शेतीशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ‘मराठवाडा वॉटरग्रीड, नदी जोड प्रकल्प, विविध सिंचन प्रकल्प, उच्च पातळीवरील बंधारे आणि मध्यम प्रकल्पांचा समावेश होता. मात्र, मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या घोषणांची आणि निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही प्रलंबित असल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणून दिले. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घ्यावा आणि संबंधित विभागांना कामे गतीने मार्गी लावण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
१७ सप्टेंबरपूर्वी प्रगती अहवाल जनतेसमोर मांडा
येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सरकारला एक महत्त्वाची सूचना केली आहे. १७ सप्टेंबरच्या आधीच संबंधित सर्व विभागांची एक संयुक्त उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि मराठवाड्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या अंमलबजावणीचा स्पष्ट अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
















