परभणी : हिंदू हितासाठी कार्य करणा-या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे अक्षय्य हिंदू पुरस्काराने दि. १९ रोजी स. प. महाविद्यालयातील कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी ऋषिकेश सकनुर यांना अक्षय्य हिंदु पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खा. प्रदीप रावत, समितीचे तुषार दामगुडे, शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, रिषभ परदेशी, निलेश भिसे, चंद्रभूषण जोशी, सारिका वाघ, महेश पवळे, रुपेश कुलकर्णी, शिवानी गोखले उपस्थित होते.
यावेळी मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते, गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्य आणि आचार्य के. आर. मनोज यांना धर्म जागरण करिता पुरस्कार देण्यात आला. तसेच कै. शरद मोहोळ यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार स्वाती मोहोळ यांनी स्वीकारला आणि अनंत करमुसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोदंडदारी श्रीरामाची अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त करणारी वीरश्रीयुक्त मूर्ती, दहा हजार रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पुरस्कार प्राप्त सकनूर यांनी आज देखील समाजात विषमतेचे वातावरण आपणास पहायला मिळते. समाजातील विषमता नष्ट होऊन समाजात शोषनमुक्त, समतायुक्त, वातावरण निर्माण झाले पाहिजे यासाठी आपण काम करणार आहोत असे पुरस्कार स्वीकारते वेळी ऋषिकेश सकनुर यांनी मत व्यक्त केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना सांगाती ट्रस्ट तर्फे डॉ. सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका यावेळी प्रदान करण्यात आली. शेफाली वैद्य यांनी पुरस्कारार्थींची मुलाखत घेतली. प्रास्ताविक सौरभ वीरकर यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिता एकबोटे यांनी केले.