नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर एफडीए विभाग चांगलाच अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. एफडीएच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. दूध, पनीर ते खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनांच्या साहित्यावर एफडीएने धाडी मारल्या आहेत. आता सौंदर्य प्रसाधनाची एक कंपनी थेट एफडीएच्या रडारवर आली आहे. या कंपनीच्या फेअरनेस क्रीममध्ये विषारी घटक असल्याचे तपासात आढळले आहे.
गोरेपणाचे स्वप्न दाखवून बाजारात सर्रास विकली जाणारी ‘गोरी ब्युटी क्रीम’ प्रत्यक्षात विषारी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत तपासणीत सिद्ध झाले आहे. या क्रीममध्ये अत्यंत विषारी जड धातू ‘पारा’ आणि ‘शिसे’ हे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळले आहेत. हे उत्पादन मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि असुरक्षित असल्याने, प्रशासनाने या क्रीमची खरेदी, विक्री, वितरण आणि वापरावर तातडीने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
कामठी आणि इतवारी परिसरातील धाडसत्र
एफडीएच्या पथकाने एप्रिल महिन्यात नागपूरजवळील कामठी आणि शहरातील इतवारी परिसरात मोठ्या प्रमाणावर धाड टाकून या ब्युटी क्रीमचा साठा जप्त केला होता. त्यानंतर १० मे रोजी या क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तब्बल दोन महिन्यांनी या तपासणीचा अधिकृत अहवाल प्राप्त झाला असून, त्यात या क्रीममधील धक्कादायक आणि जीवघेणे वास्तव समोर आले आहे.
















