पुणे : प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराचा धोका वाढला आहे. येथे आतापर्यंत १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत त्यापैकी २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गुलेन बॅरी सिंड्रोम प्रकरणे हाताळण्यासाठी महाराष्ट्राला मदत करण्यासाठी ७ सदस्यीय केंद्रीय उच्चस्तरीय तज्ज्ञ पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पुण्यात आरोग्य विभाग आणि प्रशासनातील अधिका-यांसोबत गुलेन बॅरी सिंड्रोमच्या प्रादुर्भावाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. ते पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयांना भेटी देतील.
सोलापुरातील संशयित रुग्णाचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, सदर व्यक्ती मूळचा सोलापूरचा आहे. तो पुण्यात आल्यानंतर त्याला या आजाराची लागण झाल्याचा संशय आहे, असे अधिका-यांनी सांगितले. महाराष्ट्रात जीबीएस संशयिताचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना होती त्यानंतर आणखी एका संशयिताचा मृत्यू झाल्याने संख्या २वर आली आहे.