29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रसंजयकाका विरुद्ध रोहित पाटील भिडणार

संजयकाका विरुद्ध रोहित पाटील भिडणार

तासगाव : प्रतिनिधी
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ हातात घेतले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. याचवेळी माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांनीही संजय पाटील यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाला जाणार? आणि उमेदवार कोण असणार? याबाबत सातत्याने चर्चा होत होती. या चर्चेवर बुधवारी मुंबईत पडदा पडला. हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातून भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजयकाका पाटील आणि अजित घोरपडे यांनी एकत्रित भेट घेतली. यावेळी संजयकाका पाटील विधानसभा निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झाले.

संजयकाकांचे वर्तुळ पूर्ण
तासगाव तालुक्यात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांचे २००८ साली मनोमिलन झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजयकाका सहा वर्षे विधान परिषद सदस्य होते. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे संजयकाकांचे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR