पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात सकाळी सात वाजल्यापासून बैठका घेत आहेत. विविध प्रश्नांवर नियोजित बैठका सुरू असून या बैठकांमध्ये अजित पवार यांची रोहित पवार, राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.
रोहित पवार हे सर्किट हाऊसला गेले होते. या भेटीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारीचे अनावरण रायगडावर होणार आहे. त्याआधी ही भेट झाली. अजित पवार सकाळी सातच्या सुमारास सर्किट हाऊसला आले. तिथे अचानक रोहित पवार आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. रोहित पवार हे त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने भेटीला आल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये ते भेटले. या भेटीचा अधिक तपशील समोर येऊ शकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले. तर शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव आणि चिन्ह मिळाले. या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. दरम्यान, सर्किट हाऊसला शरद पवार यांच्या गटातल्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सर्किट हाऊसवर विविध कामांनिमित्त बैठक घेतली. पुण्यात आज कालवा समितीच्या बैठकीसाठी शरद पवार गटातले अनेक आमदार, खासदार हजर होते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या भेटीबाबत सांगताना म्हटले की, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी आणि छावण्या याचा विचार गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करत असले तरी लोकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून भेट घेण्यात काही वावगं नाही.