मुंबई : टीम इंडिया टी २० वर्ल्ड कप गतविजेता आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात २०२४ साली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी २० वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले होते. रोहितने या ऐतिहासिक कामगिरीनंतर टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याला टी २० संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली. सूर्यानेही रोहितचा वारसा यशस्वीपणे चालवला आहे.
सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही टी २० मालिका गमावलेली नाही. त्यामुळे भारतात होणा-या या स्पर्धेत चाहत्यांना सूर्याकडून टी २० वर्ल्ड कप जिंकून देण्याची आशा आहे. तर दुस-या बाजूला आयसीसीने रोहितला सन्मानित केले आहे. आयसीसीने रोहितची टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. रोहितने त्याची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. सक्रीय खेळाडू असतानाही आतापर्यंत क्रिकेटमध्ये कुणालाही ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आलेले नाही. मी गेल्या वर्षाप्रमाणे कामगिरी करेन, अशी आशा आहे असे रोहितने म्हटले.
वर्ल्ड कप जिंकणं आव्हानात्मक
आयसीसी ट्रॉफी जिंकणे मोठे आव्हान आहे. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. क्रिकेटमध्ये मला १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. कारकीर्दीच्या सुरुवातीला २ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यानंतर आणखी काही ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळात संघ आणि टीम मॅनेजमेंट आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी किती उत्सूक होतो याची आठवण आहे असेही रोहितने नमूद केले.

