नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘स्पेस एक्स’चे संस्थापक आणि ‘टेस्ला’चे सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी पाच वर्षांत चौथ्यांदा हुरुन रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ५३ वर्षीय मस्क यांच्या एकूण संपत्तीत ८२ टक्के म्हणजेच १८९ अब्ज डॉलर्सची आश्चर्यकारक वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती ४२० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर गेले आहेत.
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ नुसार, वाढत्या कर्जामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यामुळे ते जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले. पण, अंबानी यांचे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान कायम आहे. याव्यतिरिक्त, भारतीय उद्योजिका एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नाडर ह्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वांत श्रीमंत महिला बनल्या आहेत. त्यांची संपत्ती ३.५ लाख कोटी एवढी आहे. तसेच त्या जागतिक स्तरावर सर्वांत श्रीमंत महिलांच्या टॉप १० यादीत स्थान मिळवणा-या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांचे वडील शिव नाडर यांनी एचसीएलमधील ४७ टक्के हिस्सा त्यांच्याकडे हस्तांतरित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी राहिले आहेत. तर गौतम अदानी भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीत जवळपास १ लाख कोटींची वाढ झाली आहे.