चंदीगड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणात विविध पक्षांकडून अनेक दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीत केजरीवाल हरियाणा दौ-यावर आहेत.
शनिवारी सुनिता केजरीवाल यांनी हरियाणातील जनतेला आपच्या जाहीरनाम्यातील पाच गॅरंटी सांगितल्या. यामध्ये महिलांना दरमहा एक हजार रुपये, मोफत वीज, मोफत शिक्षण आणि इतर गॅरंटींबाबत घोषणा करण्यात आली.
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आपने प्रचाराला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हरियाणात निवडणुकीचा मोर्चा स्वीकारला आहे. त्यांनी आज हरियाणात एका जाहीर सभेला संबोधित केले.
यावेळी त्या म्हणाल्या की, जर आपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जातील. यासोबतच त्यांनी पाच मोठ्या गॅरंटीबाबत माहिती दिली.
मोफत वीज
दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच सर्व जुनी घरगुती बिले माफ केली जातील. तसेच, वीज कपात बंद होईल. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे २४ तास वीज पुरवठा केला जाईल असे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.
सर्वांसाठी चांगले आणि मोफत उपचार
दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच प्रत्येक गाव आणि शहरातील प्रत्येक परिसरात मोहल्ला क्लिनिक बांधले जाईल. सर्व शासकीय रुग्णालयांना नवसंजीवनी दिली जाईल. नवीन सरकारी रुग्णालये बांधली जातील. आजार किरकोळ असो वा मोठा, प्रत्येक नागरिकांसाठी संपूर्ण उपचार मोफत केले जातील. सर्व चाचण्या, औषधे, ऑपरेशन्स आणि उपचार सर्व मोफत असतील. यामुळे लोकांच्या पैशांची मोठी बचत होईल आणि महागाईपासून मोठा दिलासा मिळेल, असे सुनीता केजरीवाल म्हणाल्या.
उत्तम, उत्कृष्ट आणि मोफत शिक्षण
दिल्ली आणि पंजाबप्रमाणे आम्ही शिक्षण माफिया संपवू. आम्ही सरकारी शाळा इतक्या चांगल्या बनवू की तुम्ही तुमच्या मुलांना खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळेत दाखल कराल. खासगी शाळांची गुंडगिरीही आम्ही थांबवू, खासगी शाळांना बेकायदेशीर फी वाढवण्यापासून रोखू असे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे.