सोलापूर : दूषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या मुलींच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तसा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश महापालिकेला दिले.
पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी दि.१० एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर होते. प्रारंभी त्यांनी पाणीपुरवठाविषयी महापालिकेत आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर नुकत्याच दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील दोन मुलींच्या पालकांचे त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.
या भागामध्ये ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याचे पाण्याची लाईन गेलेले आहेत त्याच्यासाठी दोन कोटी निधी उपलब्ध करून देऊ. तातडीने त्या भागातील पाईपलाईनचे काम हाती घेण्यात यावे. मुख्यमंत्र्यांनी मृत मुलींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने तातडीने तो प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना दिल्या.
सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्टी ज्या ठिकाणी अशा ड्रेनेज लाईन आहेत त्याच्याही सर्वे करून त्यालाही निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी पालकमंत्री गोरे यांच्यासह आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांच्यासह पालिकेतील अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.