पुणे : आरटीई: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने पार पडत असते. आज या कायद्याअंतर्गत निवड यादी जाहीर झाली असून शासनाची अधिकृत वेबसाइट student.maharashtra.gov.in सोडत पाहू शकता.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्यभरातील सर्व गट शिक्षण अधिकारी आणि प्रशासकीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
एकट्या पुणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत ६१,६८७ अर्ज आले आहेत. तर ९६० शाळांमध्ये केवळ १८,५०७ जागा उपलब्ध आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या देखरेखीखाली चालणा-या या प्रक्रियेद्वारे पात्र विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती राज्य सरकारकडून केली जाते.
सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. यासाठी गट शिक्षण अधिकारी आणि प्रशासकीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती समोर पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन प्रवेश नोंदविला जाईल. यानंतर अंतिम प्रवेश दिला जाईल.
पालकांना पडताळणीसाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे. त्यात प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. जे यात अपयशी ठरतील त्यांना दोन वेळा वाढीव मुदत देण्यात येईल. तसेच प्रक्रियेदरम्यान कागदपत्र चुकीचे आढळल्यास प्रवेश नाकारला जाईल.