बोरी : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बोरी येथे दि. ३१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्टेशन ते जिजाऊ उद्यानपर्यंत एकता दौड काढण्यात आली. परभणी पोलिस दलाच्या वतीने रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
बोरी पोलिस स्टेशन ते राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानपर्यंत ही एकता दौड काढण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांभ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या दौडमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांभ स्वामी, पोलिस उपनिरीक्षक थोरवे, महादेव गायकवाड, घोरपडे, अनिल मुंडे, श्रीराम दंडवते, चौधरी यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद मुरक्या, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका कार्याध्यक्ष मुंजाभाऊ कंठाळे, पत्रकार संतोष लहाने, जफर शेख व सामाजिक कार्यकर्ते वामनराव शिंपले, महसूल सेवक मयूर टाक यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या दौडचे आयोजन करण्यात आले होते. देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे बोरी परिसरात देशभक्ती, एकता आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.
















