परभणी : सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे दि.२३ सप्टेंबर रोजी अभियंता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५८ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व प्रमुख अतिथी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गावडे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदान केल्याने शरीर निरोगी राहते. तुमचे रक्त घेतले जाते म्हणजे तुम्ही निरोगी आहात हे प्रमाणित होते.
रक्तदान केल्याने एखाद्याला जीवदान मिळते. त्यामुळे जनतेने रक्तदान शिबिरास हजर राहून वळोवेळी रक्तदान करावे असे जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळी आवाहन केले. पोलिस अधीक्षक परदेशी म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. नागरीकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान सारख्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा लाभ घ्यावा. रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी उपविभागीय अभियंता बी.एम. शिंदे, बालाजी पवार, संजय देशपांडे, बी.एल. सामाले, विभागीय लेखाधिकारी कुलदिपसिंग मिना, सतिष कानेगावकर, सुभाष हकदळे, कंत्राटदार अशोक जेठवाणी, सुधीर पाटील, एम.आर. काळे, मुरली खुपसे, सुरेंद्र नेब आदिंनी परीश्रम घेतले.