23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीडमध्ये शनिवारी सद्भावना यात्रा

बीडमध्ये शनिवारी सद्भावना यात्रा

सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन

बीड : बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय वीण पुन्हा नव्याने बांधता यावी, म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला असून, त्या पार्श्वभूमीवर महिला दिनी सद्भावना यात्रेनिमित्त बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणा-या सर्व जाती संघटनांना पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी उभ्या केलेल्या ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेवर सपकाळ मुक्काम करणार आहेत. एखाद्या काँग्रेस अध्यक्षाने स्वयंसेवी संस्थेत मुक्काम करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.

या यात्रेत शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी काम करणारे दीपक नागरगोजेसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तसेच मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी या सद्भावना यात्रेत सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे फक्त तिरंगी झेंड्यासह मान्यवर मंडळी यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत १०० हून अधिक गायींचा सांभाळ करणा-या शब्बीर मामू यांनाही आवर्जून बोलावण्यात आले आहे.

८ मार्च रोजी ही पदयात्रा काढण्यात येणार असून हर्षवर्धन सपकाळ भगवान गड आणि नारायण गड या दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. बीड जिल्ह्यात विविध कारणांमुळे निर्माण झालेली जातीय दुफळी कमी व्हावी, असे प्रयत्न वेगवेगळ््या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

पदयात्रेचा समारोप बीडमध्ये
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आखलेल्या या पदयात्रेसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी जिल्ह्यातील दोन्ही समाजांतील प्रमुख व्यक्तींनी या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीगत गाठीभेटी घेतल्या आहेत. ४६ किलोमीटरच्या या पदयात्रेचा समारोप बीड शहरात होणार असून तेथे एक सभाही घेतली जाणार आहे.

नेकनूरमध्ये सद्भावना यात्रा
नेकनूर भागात एकमेकांच्या दुकानातून वस्तू खरेदी न करण्यापर्यंतची मानसिकता झाली होती. या गावात ही यात्रा थांबणार आहे. यात्रेत सर्व जातीची माणसे सहभागी होतील. पण वंजारी आणि मराठा या दोन्ही जातींमधील प्रमुखांना बोलावण्यात आले आहे. ‘यात्रेत पक्षाचा झेंडा असणार नाही. सद्भावना ठेवा हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून व सेवा दलाचे ध्वजारोहण करुन एक हजार स्वयंसेवक या यात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी सर्व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR