23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडासाहेब ४३४ धावांनी चितपट; ‘सर’ जडेजाचे शतक व पाच बळी

साहेब ४३४ धावांनी चितपट; ‘सर’ जडेजाचे शतक व पाच बळी

मैदानाबाहेरून
राजकोट कसोटीमध्ये टीम इंडियाने साहेबांना अक्षरश: चितपट केले. त्यांचे ‘बॅज बॉल तंत्र’ दुस-या डावात चालू शकले नाही. शेवटचा खेळाडू मार्क वूडने मात्र १५ चेंडूत ३३ धावा करत थोडासा प्रतिकार केला. चौथ्या दिवसाचे शेवटचे षटक शिल्लक असताना रवींद्र जडेजा (४१ धावांत ५) आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीपुढे साहेबांनी शरणागती पत्करली. या कसोटीचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जयस्वालचे सलग दुसरे ‘द्विशतक’.

काल तो १०४ धावांवर निवृत्त झाला होता तर आज शुभमन गिल बाद झाल्यानंतर फलंदाजीस आला. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद २१४ धावा केल्या. त्याच्या बॅटचा तडाखा इतका जोरदार होता की, त्याने १४ चौकार व १२ षटकारांची आतषबाजी केली. एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही भारताकडून आपल्या नावावर केला. पहिल्या डावात जडेजा ९९वर असताना सरफराज खानला धावबाद व्हावे लागले. त्याच प्रकारे आज शुभमन गिल (९१) वर असताना कुलदीपच्या चुकीमुळे धावबाद व्हावे लागले.

नवोदित रजत पाटीदारला मात्र संधीचे सोने करता आले नाही. कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत अर्धशतक (६२ व नाबाद ६८)करण्याचा पराक्रम सरफराज खानने आपल्या नावावर केला. सलग दोन कसोटीत द्विशतक करण्याचा पराक्रम यशस्वी जयस्वालच्या अगोदर विनोद कांबळी व विराट कोहली यांनी केला होता. यजमानांनी दुस-या डावात इंग्रजांचे तंत्र अवलंबिले आणि १३१ षटकांतच ४४५ धुवांधार धावा जमवल्या. साहेबांना ५६७चे अशक्यप्राय आव्हान दिले.

फिरकीपटूंना स्वीप फटक्याच्या नादात सलामीचे क्रॉली, बेअस्टो, रूट आणि कर्णधार स्टोक्स हे चार फलंदाज एलबीडब्ल्यू झाले. जडेजाने कसोटीत शतक आणि डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम दुस-यांदा केला त्यामुळे घरच्या मैदानावर त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. साहेबांची फलंदाजी इतकी ढासळली की त्यांना पराभूत होण्यासाठी पाचव्या दिवसाची वाट पहावी लागली नाही. टीम इंडियाने पाच कसोटींच्या मालिकेत २-१ने आघाडी घेतली असून चौथी कसोटी रांची येथे २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR